भगवान परशुराम जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम !

Foto

औरंगाबाद : भगवान परशुराम जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६:३० वाजता अखिल भारतीय पेशवा संघटनेच्यावतीने परशुराम चौक येथे भगवान परशुरामाचे पूजन करण्यात आले. तर शिवाजीनगरातील वाणी मंगल कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. भगवान परशुराम यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त अखिल भारतीय पेशवा संघटनेसह विविध संघटनांनी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भगवान परशुराम चौकात सकाळी सात वाजता परशुरामांचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शिवाजीनगर येथे प्रतिमापूजन तसेच रामनगर येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. 

सिडको एन ९ रेणुका माता मंदीरातही भगवान परशुरामाची पूजा करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम घेता चिकलठाण्यातील गोशाळेला चारा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गाईंना चारा देण्यात आला. त्याचबरोबर पहिली ते दहावीपर्यंतच्या पाच गरीब विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे. संध्याकाळी सात वाजता रेणुकामाता मंदिर सिडको येथे महाआरती होणार असून प्रसिद्ध व्याख्याते पार्थ बावस्कर यांचे 'ब्राह्मणांच्या शौर्यगाथा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. भगवान परशुराम जयंतीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून दुचाकी रॅली, कार रॅली यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन पेशवा संघटनेतर्फे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दिली. यावेळी लक्ष्मीकांत पांडे, आशुतोष देव, अनिल महाजन, वैभव कुलकर्णी, श्रीमती रत्नप्रभा पोहेकर, कुणाल वैद्य, अक्षय जोशी, श्रीराम गाडेकर, अधिरथ कन्नडकर, आर्यन कुलकर्णी, मनोहर जोशी, प्रत्यूष कन्नडकर, मिलिंद गोडसे आदींची उपस्थिती होती.